- आगामी निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती निश्चित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ नोव्हेंबर २०२५) :-आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेला “इच्छुक उमेदवार तथा कार्यकर्ता संवाद बैठक” यशस्वीरित्या संपन्न झाला. या बैठकीमुळे पक्षाच्या निवडणुकीच्या तयारीला महत्त्वपूर्ण गती मिळाली असून, शहर विकासाचा संकल्प सिद्धीस नेण्याची घोषणा पक्षाकडून करण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी आम आदमी पार्टी, महाराष्ट्र राज्याचे समन्वयक, अमित म्हस्के यांचे प्रमुख धोरणात्मक मार्गदर्शन लाभले, तर शहराध्यक्ष रविराज काळे यांनी कार्यक्रमाचे नेतृत्व केले.
अमित म्हस्के यांनी उपस्थित सर्व इच्छुक उमेदवार आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना धोरणात्मक मार्गदर्शन केले. त्यांनी दिल्लीतील ‘आप’ सरकारने शिक्षण, आरोग्य, आणि मूलभूत सेवांवर यशस्वीरित्या अंमलात आणलेल्या ‘दिल्ली मॉडेल’च्या पारदर्शक आणि कल्याणकारी कारभाराचे महत्त्व स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी हे मॉडेल कसे उपयुक्त ठरू शकते, तसेच भ्रष्टाचाराला प्रतिबंध घालून शहराच्या विकासाची ध्येयधोरणे कशी निश्चित करावी, यावर त्यांनी भर दिला.
शहराध्यक्ष रविराज काळे यांनी बैठकीच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यांनी स्पष्ट केले की, या बैठकीद्वारे पक्षाच्या निवडणुकीच्या रणनीतीला सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवडकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी, तसेच त्यांना भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक प्रशासन देण्यासाठी सामूहिक प्रयत्नांनी मैदानात उतरण्याचे आवाहन त्यांनी केले. या बैठकीस लाभलेल्या प्रतिसादानंतर ‘आप’ने स्पष्ट केले आहे की, पक्ष पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज असून, शहराला पर्यायी आणि सक्षम नेतृत्व देण्यासाठी ठोस पाऊले उचलली जातील, यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.













