- तहसीलदार व दुय्यम निबंधक निलंबित..
- अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीचे नाव चर्चेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ६ नोव्हेंबर २०२५) :- पुण्यातील मुंढवा भागातील सुमारे ४० एकर सरकारी जमिनीचा केवळ ३०० कोटींना झालेला व्यवहार उघड झाल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे.
या जमिनीची बाजार किंमत तब्बल १,८०० कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. व्यवहारात मोठा गैरव्यवहार झाल्याच्या आरोपानंतर पुण्याचे तहसीलदार सुर्यकांत येवले आणि उपनिबंधक रविंद्र तरू यांना शासनाने तातडीने निलंबित केले आहे.
सदर जमीन एका कंपनीच्या नावे विकण्यात आली असून, या कंपनीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार भागीदार असल्याचे सांगितले जाते.
व्यवहारात फक्त ५०० रुपये ते २१ कोटी रुपये इतकीच स्टॅम्प ड्यूटी भरल्याचा आरोप आहे. महसूल विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.
या प्रकरणावर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा व्यवहार अत्यंत गंभीर असल्याचे सांगून चौकशी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.













