- डॉ. बाबा कांबळे यांचा पिंपरी-चिंचवड मनपा प्रशासनाला इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मोरवाडी चौकात बसविलेला अनावश्यक व अशास्त्रीय काँक्रीट डिव्हायडर तात्काळ हटवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र रिक्षा पंचायत व ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी दिला आहे.
या डिव्हायडरमुळे वाहतूक कोंडी, अपघात व रिक्षाचालकांना होणारा त्रास वाढला असून, प्रशासनाने कोणताही शास्त्रशुद्ध अभ्यास न करता हा निर्णय घेतल्याचा आरोप संघटनेने केला आहे. “सुशोभीकरणाच्या नावाखाली भ्रष्टाचार होत असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी डॉ. कांबळे यांनी केली.
संघटनेने मनपाकडे तात्काळ डिव्हायडर हटविणे, चौकशी करून दोषींवर कारवाई, तसेच नागरिकांच्या सहभागाने रस्ते प्रकल्प राबविण्याच्या मागण्या केल्या आहेत. सोमवार (दि. १०) रोजी सकाळी ११:३० वाजता मनपा मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती फेडरेशनचे युवक अध्यक्ष शुभम तांदळे यांनी दिली.
















