न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ६ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने इन्स्टाग्रामवर पिस्टलसह फोटो पोस्ट करणाऱ्या एका तरुणावरून सुरू केलेल्या तपासात सहा विधी संघर्षीत बालकांना ताब्यात घेतले आहे.
त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत राऊंड जप्त करण्यात आले असून, या बालकांनी एका इसमाचा खून करण्याचा कट रचल्याचेही पोलिसांनी उघड केले आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या निर्देशानुसार सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याच्या मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. इन्स्टाग्रामवरील “adyaa” या आयडीवर दोन पिस्टलसह फोटो पाहून पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली. चौकशीतून औंध परिसरातून दोन आणि त्यानंतर आणखी तीन विधी संघर्षीत बालकांना अटक करण्यात आली. सहा बालकांच्या कबुलीजबाबात त्यांनी रवी ससाने (रा. वाघोली) याचा खून करण्याचा कट केल्याचे उघड झाले.
या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक सुनिल भदाणे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सहभाग घेतला. ही संपूर्ण मोहिम डॉ. शिवाजी पवार (पोलीस उपायुक्त, गुन्हे), प्रविण मोरे (सहाय्यक पोलीस आयुक्त), आणि वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सदर प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६१(२), ३(५), तसेच भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.













