न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १४ एप्रिल २०२५) :- वैयक्तिक दुःखाच्या प्रसंगी सामूहिक माणुसकीचा स्पर्श लाभणे ही समाजातील संवेदनशीलतेची अत्युच्च पातळी मानली जाते. कै. सौ. ईश्वरी सुशांत भिसे यांच्या आकस्मिक निधनानंतर निर्माण झालेल्या अत्यंत दुर्दैवी परिस्थितीत सूर्या मदर अँड चाइल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, वाकड – पुणे यांनी ज्या प्रकारे सामाजिक बांधिलकीची भूमिका पार पाडली, त्याचा गौरव करण्यासाठी आज दिनांक : १४ एप्रिल २०२५ रोजी सूर्या हॉस्पिटल, वाकड – पुणे येथील डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा महाराष्ट्र विधानमंडळातील स्वीय सहाय्यक परिवाराच्या वतीने सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दोन जुळ्या बालिकांच्या जन्मानंतर त्यांच्या मातोश्रींच्या मृत्यूमुळे निर्माण झालेल्या तात्कालिक भावनिक आणि सामाजिक गरजांच्या पार्श्वभूमीवर, हॉस्पिटल प्रशासनाने लाभ-हानीच्या गणिता पलीकडे जाऊन अत्यंत मानवी दृष्टिकोनातून संवेदनशील भूमिका बजावली. केवळ वैद्यकीय उपचारच नव्हे तर त्या चिमुकल्यांच्या संगोपनासाठी आवश्यक आधार यंत्रणा उभी करून, एक सामाजिक उदाहरण समोर ठेवले.
कार्यक्रमात हॉस्पिटलचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन शहा आणि डॉ. दिनकर पासलकर यांनी प्रतिनिधित्व केले. या वेळी बाला शुक्ला, आनंद ठोकळ आणि अजित गरुड या स्वीय सहाय्यक सदस्यांनी प्रतिनिधी म्हणून भावना व्यक्त केल्या व डॉ. सचिन शहा यांनी हॉस्पिटलच्या वतीने आपली भावना व्यक्त करत, सामाजिक बांधिलकी जपण्याची हीच प्रेरणा असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमास बाला शुक्ला, एकनाथ बाजारे, मयुर तातुसकर, हर्षद धर्माधिकारी, आनंद ठोकळ, अजित गरुड, शहाजी पवार, किशोर जुमडे, आणि सचिन भामे, रवींद्र कडू, डॉ संतोष ढोरे हे उपस्थित होते. यावेळी मंदार रांजेकर अध्यक्ष, राष्ट्रीय कला अकादमी (न्यास) पुणे यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते अमर लांडे यांनी मानवते च्या रांगोळीच्या माध्यमातून रुग्णालयाच्या प्रती सद्भावना व्यक्त केली. सदर प्रसंगी डॉक्टर सचिन शहा यांच्याकडे सन्मान प्रमाणपत्र, भक्ती शक्ती शिल्प,शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या सन्मानप्रसंगी त्यानी व्यक्त केलेल्या भावनांचा एका वाक्यातील सार म्हणजे –
“जिथं शब्द अपुरे पडतात, तिथं माणुसकीची सावली आधार बनते.” याचबरोबर समाजात चांगल्या कार्याचे कौतुक झाल्यास काम जोमाने करण्याचे प्रोत्साहन आणि ताकद मिळते व कर्तव्य भावना चा विसर होत नाही.
जे आजच्या वैद्यकीय क्षेत्रात दिवसेंदिवस माणुसकी चा विसर पडून व्यापारीकरण होत असल्याबाबत प्रकर्षाने दिसून येते.