न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने पिंपरी कॅम्पातील ‘बी’ ब्लॉक, रिव्हर रस्ता येथील एका अनधिकृत बांधकामावर अर्धवट कारवाई केली. कारवाईनंतर त्याच बांधकामावर नव्याने बांधकाम करण्यात आले आहे. यामुळे परिसरातील इतर घरांना धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे सदर अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी, अशी मागणी सुनील काळे यांनी महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सुनील काळे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व पोलिस आयुक्त प्रज्ञनाभन यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी कॅम्पातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेने कारवाई केली. सदर इमारत अर्धवट पाडण्यात आली आहे. सदर इमारत धोकादायक असताना पालिका अधिका-यांना हाताशी धरून, त्यावर नव्याने स्लॅब टाकून, वाढीव बांधकाम करण्यात आले आहे.
बांधकाम कमकुवत असताना स्लॅब टाकल्याने परिसरातील इतर घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे सदर अनधिकृत बांधकाम संपूर्ण काढून टाकण्याची महापालिकेने तातडीने कारवाई करावी, असे या निवेदनात काळे यांनी म्हटले आहे.















