न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १९ एप्रिल २०२५) :- मावळ तालुक्यातील उर्से ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या टोलनाक्याला उर्से टोलनाका असे नाव द्यावे अशी मागणी म शेतकरी कृती समिती, उर्से ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
कृती समितीचे अध्यक्ष सुभाष धामणकर, सरपंच भारती गावडे, सदस्य सतीश कारके, सुधीर बराटे, कृष्णाजी कारके, बाळासाहेब कारके, भारत ठाकूर, भास्कर ठाकूर, गुलाब धामणकर, संदीप आंबेकर, गुलाबराव घारे, जालिंदर धामणकर, विश्वनाथ शेलार आदींनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री, रस्ते विकास महामंडळ, संबंधित सर्व विभागांना पत्रे पाठवली आहेत.
पत्रात म्हटले आहे की, द्रुतगती महामार्गावरील उर्से ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या टोलनाक्याला उर्से टोलनाका असे नाव द्यावे ही कृती समिती व ग्रामस्थांची गेल्या १५ ते २० वर्षांपासूनची मागणी आहे. ५ सप्टेंबर २०२२ च्या उर्से ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत वरील विषय ठराव क्रमांक १८ ने पारित झाला आहे, त्याची प्रतही दिलेली आहे. त्यासंदर्भात रस्ते विकास महामंडळ व संबंधित विभागांना वेळोवेळी भेटून पत्रव्यवहार केला आहे. परंतु अद्याप दखल घेतली नाही.
टोलनाका परिसरात कोणतीही घटना घडल्यास उर्से टोल नाका असा उल्लेख केला जातो. त्यासाठी टोलनाक्याला तसे नाव देणे आवश्यक आहे. महामंडळाने याबाबत त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असेही स्मरणपत्रात म्हटले आहे.












