न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड शहराची महापालिकेत सोशल मीडिया अॅक्टिव्ह होणार आहे. पालिकेतील प्रत्येक विभागाने आपण केलेली किंवा करत असलेली कामे नागरिकांपर्यंत पोहचवावीत या उद्देशाने सोशल मीडिया सेलची स्थापना करण्यात आली आहे. महापालिकेतील विविध कार्यक्रमांची माहिती सोशल मीडियावर प्रसिद्ध करून नागरिकांना तातडीने उपलब्ध होईल, या दृष्टीने कामकाज करण्यासाठी या सेलची स्थापना करण्यात आली आहे.
महापालिकेतील शहर परिवर्तन विभागाबरोबरच अन्य प्रशासकीय कामकाजासाठी विविध एकूण २० अधिकारी व कर्मचा-यांची विभागाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व विभागांची माहिती अधिकृतपणे उपलब्ध करुन देणे, असे या प्रवक्त्याचे काम असणार आहे. या सोशल मीडिया सेलमध्ये शहरतील कार्यालयाची भूमिका अन्य विभागांच्या तुलनेत अधिक महत्त्वाची ठेवण्यात आली आहे.
सोशल मीडिया सेलमध्ये सहाय्यक आयुक्त आण्णा बोदडे, लिपिक खुशाल पुरंदरे व अंकुश कदम तसेच शहर परिवर्तन कार्यालयातील सेबेस्टीयन सोनी व किरण पंडित, कॉम्प्युटर प्रोग्रॅमर उज्वला गोडसे आणि सुधीर बोऱ्हाडे यांचा समावेश असणार आहे. या सेलची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. मात्र, आयुक्त हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी इलेक्शन ड्युटीवर असल्याने या सेलची प्राथमिक बैठक होऊ शकलेली नाही. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर याच आठवड्यात या सेलची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. संयुक्त बैठकीत शहर परिवर्तन कार्यालय व नियुक्त केलेल्या प्रवक्त्यांची जबाबदारी समजावून दिली जाणार आहे.











