न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जलतरण तलावाच्या तिकीट विक्रीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी क्रीडा विभागाच्या लिपिकावर तत्काळ सेवा निलंबनाची कारवाई करून, खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. किरण शाम भोईर, असे या लिपिकाचे नाव आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका क्रीडा विभागामध्ये लिपिक पदावर कार्यरत असलेल्या भोईर यांच्याकडे कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने संभाजीनगर, चिंचवड येथील साई अॅक्वामरिन जलतरण तलावावर व्यवस्थापकीय पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी ३० जानेवारी २०१९ रोजी अचानक तलावाची तपासणी केली. त्यावेळी तलावामध्ये १४ नागरीक पोहत होते. त्यामध्ये सहा जणच पासधारक होते तर, उर्वरित आठ जणांकडे गेस्ट पास असणे गरजेचे होते. मात्र, चारच तिकिटांची विक्री झाली होती.
कारणे दाखवा नोटीसीला भोईर यांनी केलेला खुलासा संयुक्तिक वाटला नाही. त्यामुळे तात्काळ सेवा निलंबनाची कारवाई करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.











