- कर्मचाऱ्यांचे पगार, ठेकेदारांची बिलं, विकासकामे रखडली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने एक एप्रिलपासून ई-ऑफिस या संगणक प्रणालीद्वारे पेपरलेस कारभार सुरू करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण नसल्याने तसेच, तांत्रिक बाबीमुळे अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन मिळालेले नाही. आता त्याचा फटका स्थायी समितीच्या बैठकीस बसला आहे. नव्या प्रणालीत विषयपत्र तयार होत नसल्याने मंगळवारी (दि. २२) स्थायी समिती सभा रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढविली.
त्यामुळे बैठक रद्द करत विभागप्रमुखांची नावाला बैठक घेण्यात आली. नवीन तंत्रज्ञानानुसार डिजिटल प्रणालीचा वापर करण्यासाठी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वतीने ई-ऑफिस ही प्रणाली महापालिकेसाठी तयार करण्यात आली आहे. त्यावर तब्बल ११२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या प्रणालीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. आवश्यक त्या सर्व चाचण्या करण्यात आल्या, विभागप्रमुख, वरिष्ठ अधिकारी, शासन अधिकारी, शाखाप्रमुख, लिपिक यांना शासकीय कामकाजासाठी डिजिटल कोड टाकण्यात आले आहेत. मार्चअखेर महापालिकेच्या सर्व विभागातील कागदपत्री कामकाज बंद करून १ एप्रिल २०२५ पासून ऑफिस प्रणाली पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेच्या सर्व विभागांत कागदपत्रे तसेच, फाईलीवर कामकान करणे १०० टक्के बंद करण्यात आले आहेत.
महापालिकेच्या अनेक कर्मचाऱ्यांना योग्य काम करण्यात विविध अडथळा येत आहेत. संबंधित विभागाकडून अतिरिक्त आयुक्त त्यानंतर आयुक्त यांच्याकडे नव्या संगणक प्रणा-लीद्वारे विषयाचा प्रस्ताव जात नाहीत. विभागामध्येच अनेक दिवस एखाद्या प्रस्तावावर खल केला जातो. तसेच, त्यामध्ये येणारे अडथळे दूर करण्यात अपयश येत आहे. परिणामी स्थायी समितीच्या बैठकीसाठी विषयपत्र तयार होत नाही. त्याचा परिणाम स्थायी समितीच्या बैठकांवर झाला असून दोन आठवडे बैठक झाली नाही. परिणामी विविध कामांना उशिराने सुरुवात येणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
दर महिन्यास एक तारखेस महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या बँक खात्यावर जमा होते. मात्र, या नव्या ई-ऑफिस प्रणालीतील तांत्रिक अडथळ्यामुळे अद्याप काही विभागातील कर्मचाऱ्याचे वेतन झाले नाही. त्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. स्थायी समिती बैठक रद्द झाल्याने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली. त्यात पाऊस, पूर, रस्त्यांवर पाणी साचणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली. त्यासंदर्भात केंद्राच्या संस्थेकडून सादरीकरण करण्यात आले. त्या संस्थेच्या वतीने निगडी येथील दुर्गादेवी टेकडीवर फलक लावण्यात येणार आहे. संस्थेच्या तंत्रज्ञानानुसार शहरात कधी पाऊस पडणार याचा अंदाज वर्तवला जाणार आहे. तसेच, धरण व नदीची पाणी पातळीबाबतची माहितीचा अलर्ट दिला जाणार आहे. तसेच, राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रम आराखड्यावर चर्चा करण्यात करण्यात आली.











