न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२५) :- महापालिका शिक्षकांचे वेतन महिन्याच्या १ तारखेला करण्याचे आदेश असले, तरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे शिक्षकांच्या वेतनाला विलंब होतो. अर्धा एप्रिल महिना संपत आला, तरी अजूनही महापालिकेच्या शाळांमध्ये शिकविणाऱ्या १३०० शिक्षकांचे वेतन झालेले नाही. पगार उशिरा होत असल्याने अनेक शिक्षकांची आर्थिक ओढाताण होत आहे.
सर्व शाळांनी १ तारखेपर्यंत पगार बिले जमा करणे अपेक्षित आहे; परंतु या महिन्यापासून २२ तारीख उजाडली तरी पगार बिले वेळेत तयार होऊन पगार झाला नाही. त्यामुळे शिक्षकांना घरभाडे, दूध, किराणा, कपडे, पेट्रोल दैनंदिन व्यवहार आणि घराचे हप्ते, बँकांचे हप्ते, गाडीचे हप्ते भरण्यात अडचणी येत आहेत. शिक्षकांचे पगार वेळेत व्हावेत, यासाठी शिक्षक संघटना महापालिका अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. यावर तोडगा काढण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.
काही तांत्रिक कारणांमुळे महापालिका शाळेतील शिक्षकांचा एप्रिलचा पगार देण्यास विलंब झाला आहे. अनेक शिक्षकांनी याबाबत कळविले आहे. लवकरच वेतन देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
– संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, महापालिका…











