न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२५) :- पिंपरी मतदारसंघात संत तुकारामनगरमध्ये म्हाडाच्या ४० वर्षे जुन्या झालेल्या ९४१ घरांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. ‘म्हाडाच्या घरात मागील ४० वर्षापासून वास्तव्य असणाऱ्या नागरिकांना आता त्यांच्या हक्काचे, सुसज्ज आणि सुविधाजनक घर मिळणार आहे. हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे,’ असे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सांगितले. संत तुकारामनगर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित संस्थेच्या उद्घाटन व नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
‘संत तुकारामनगर सहकारी गृह रचना संस्था’ नावाने स्थापन केलेल्या सोसायटीचे उद्घाटन, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते झाले.
यावेळी ते म्हणाले की, ‘संत तुकारामनगरमधील या घरांचा पुनर्विकास होणार असल्यामुळे म्हाडाच्या घरात राहणाऱ्या कुटुंबांसाठी आता नवा आशेचा किरण निर्माण झाला आहे. या भागातील नागरिक मागील चार दशके अवघ्या ३०० स्क्वेअर फूट जागेत राहतात. आज ज्यांचे वास्तव्य इथे आहे त्या सर्वासाठी हे घर म्हणजे केवळ निवारा नाही, तर स्वाभिमानाचे प्रतीकआहे. योजना पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना ९०० ते १००० स्क्वेअर फुटांची घरे मिळतील’ अशी भावना बनसोडे यांनी व्यक्त केली.










