- रविवारी हजारो पर्यावरणप्रेमी उतरले रस्त्यावर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२५) :- मुळा नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली महापालिकेकडून पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे. ‘नदी वाचवा, झाडे वाचवा, जीवन वाचवा’ म्हणत आरएफडी रद्द करा, अशा घोषणा देत मुळा सुधार प्रकल्पाला विरोध केला. स्वच्छ, प्रवाही आणि प्रदूषण मुक्त नदी हवी, यासाठी नदीकाठी रविवारी (दि. २७) हजारो पर्यावरणप्रेमी रस्त्यावर उतरले होते.
आंदोलनस्थळी विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांनी यावेळी भेट देत नदीपात्राची पाहणी केली. तसेच नदी सुधार प्रकल्पाच्या कामाला स्थगिती देण्याचे आदेश आयुक्त सिंह यांना दिले.
पिंपळे निलख येथील स्वर्गीय अशोक कामठे उद्यानापासून रविवारी सकाळी ८:३० वाजता स्मशानभूमीपर्यंत पदयात्रा काढण्यात आली. नदी पात्रात थांबून पर्यावरणप्रेमींनी प्रकल्प रद्द करण्याच्या घोषणा दिल्या. यावेळी ‘साद घालते मुळामाई, प्रतिसाद देऊ तिला, संकटातुनी करू या मुक्त’, ‘या प्रशासनाचे करायचे काय, खालीडोकंवर पाय’, अशा घोषणा देण्यात आल्या.
मुळा नदी सुधार प्रकल्पाला शहरातील दीडशेहून संघटना, पर्यावरणप्रेमी, रहिवाशांनी विरोध केला आहे. वृक्षतोड थांबवा, सिमेंट काँक्रिटीकरण थांबवा, नको जॉगिंग आणि सायकल ट्रक, आम्हाला नदी स्वच्छ, प्रदूषण मुक्त हवी आहे, अशा घोषणा आंदोलक देत होते.











