- मोठा अपघात झाल्यानंतर येणार सरकारला जाग?..
- खासदार, आमदारांकडून फक्त गाजराचचं आश्वासन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२५) :- तळेगाव-चाकण महामार्गाला जोडणारा तीर्थक्षेत्र देहू ते देहू फाटा दरम्यानचा रस्ता ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे धोकादायक बनला आहे. खड्डेमय मार्गावर वारंवार अपघात घडत असून भाविकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा नादूरुस्त रस्ता रुंदीकरणासह दर्जेदार कामाच्या प्रतीक्षेत आहे.
तीर्थक्षेत्र देहू ते देहू फाटा हा जवळपास ३ किमीचा रस्ता मावळ, खेड आणि हवेली तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता आहे. या परिसरातील भंडारा डोंगर, सुदुंबरे गावातील संत जगनाडे महाराज तीर्थक्षेत्र, भामचंद्र डोंगर, संत तुकाराम महाराजांची कन्या भागिरथी मातेचे सासर तीर्थक्षेत्र येलवाडी आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची जन्म, कर्म, ज्ञान भूमी असणारे तीर्थक्षेत्र देहूगाव ही ठिकाणे भाविक वारकऱ्यांसाठी पवित्र आहेत. त्यामुळे या मार्गावर भाविकांची सतत वर्दळ असते.
यासह तळेगाव, चाकण, तळवडे भागात औद्योगीकरण असल्याने ह्या रस्त्यावर अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. तीर्थक्षेत्र देहूमध्ये वर्षातून तीन वेळा मोठ्या यात्रा भरतात, तर प्रतिदिन हजाराहून अधिक भाविक दर्शनासाठी येत असतात. दर्शनार्थ येणाऱ्या वारकरी भाविकांनाही याच मार्गावरून ये-जा करावे लागत असते, अशावेळी हा नादुरुस्त रस्ता सर्वांसाठीच धोकादायक ठरत आहे.
देहूफाटा ते देहूगाव रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे गतिरोधक असून हे गतिरोधक नियमानुसार नसल्याचे दिसतात. गरजेपेक्षा अधिक उंच व पांढरे पट्टे नसल्याने हे गतिरोधक देखील जीवघेणे ठरत आहेत. त्यामुळे अवजड वाहने येथून जात असताना सकाळ-सायंकाळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. देहू फाटा ते देहूगाव दरम्यान किमान शंभर फुटी रस्त्याचे रुंदीकरण व्हावे, रस्त्याच्या दुतर्फा किमान चार फुटांचा पदपाथ असावा, पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारलाइन व्हावी, मध्यभागी डिव्हाइडर असावेत, रस्त्यालगत विद्युत पथदिवे असावेत, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
आठ वर्षांपूर्वी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया झाल्याची आणि अनेक बाधित शेतकऱ्यांनी रकमाही घेतल्याची माहिती येलवाडीचे माजी सरपंच नितीन गाडे यांनी दिली. परंतु, रस्ता रुंदीकरण आणि नूतनीकरणासाठी तळेगाव-चाकण-महामार्ग कृती समिती, येलवाडी ग्रामस्थ आणि भाविकांनी वारंवार आंदोलने करूनही तात्पुरती डागडुजी वगळता रस्त्याचे काम कधीही चांगले झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.











