न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०१९) :- तळेगाव पोलिस ठाण्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोक्का, दरोडा आणि खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेला पोलिस रेकॉर्डवरील आरोपी बंदर ऊर्फ दीपक सावंत पोलिसांच्या जाळ्यात अडकला. आरोपी बंदर सृष्टी चौक सांगवी येथे येणार असल्याची माहिती पोलीस नाईक निशांत काळे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सृष्टी चौकात सापळा रचून बंदर याला ताब्यात घेतले आहे.
उडवाउडवीची उत्तरे दिल्याने चौकशीसाठी त्याला खंडणी दरोडाविरोधी पथक गुन्हे शाखा येथे आणून कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यावरून पोलिसांनी त्याला अटक केली. बंदर ऊर्फ दीपक सावंत (वय २२, रा . गांधीनगर झोपडपट्टी, पिंपळे गुरव ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे तळेगाव पोलीस ठाण्यातील एक हिंजवडी पोलीस ठाण्यातील दोन आणि सांगवी पोलीस ठाण्यातील एक असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत.











