न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०१९) :- अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेच्या मावळ तालुका अध्यक्षासह तिघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली. बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे. अटक केलेल्या तिघांकडून दोन गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. चरण बाळासाहेब ठाकर (वय २६, रा. दारुंब्रे, ता. मावळ), प्रदीप शिवाजी खांडगे (वय २८, रा. पांगरी, ता. खेड) आणि राजू शिवलाल परदेशी (वय ५९, रा. दत्तवाडी, कुसगाव बुद्रुक, ता. मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, इंद्रायणी हॉस्पिटलसमोर केळगाव रोड आळंदी येथे एक व्यक्ती पिस्तूल विकण्यासाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी इंद्रायणी हॉस्पिटलसमोर सापळा रचून चरण याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. पोलिसांनी हा ऐवज जप्त करत त्याला अटक केली. आळदी पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
चरण याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या ओळखीचा प्रदीप खांडगे यांच्याकडून पिस्तूल विकत घेतले असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी प्रदीप खांडगे याचा शोध घेऊन त्यालाही अटक केली. दोघांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी मध्यप्रदेश राज्यातून दोन पिस्तूल आणले आहेत. त्यातील एक पिस्तूल चरण याला विकले आहे. तर, दुसरे पिस्तूल कुसगाव लोणावळा येथील त्याचा मित्र राजु परदेशी याला विकले आहे, अशी प्रदीप याने माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी राजु परदेशी याला देखील अटक केली. तिघाकडून एकूण २ पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे असा ऐवज जप्त केला आहे.
आरोपी ठाकर हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच तो कुविख्यात डॉन अरुण गवळीच्या भारतीय सेनेचा मावळ तालुका अध्यक्ष आहे. त्याच्यावर तळेगाव पोलिस ठाण्यात मारहाणीचे आणि दारूविक्रीचे गुन्हे दाखल आहेत. तर प्रदीप खांडगे याच्यावर दुखापतीचा गुन्हा दाखल आहे.











