न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०१९) :- पावसाळ्याचे वेध लागले, की शहरातील नालेसफाईच्या कामांना सुरवात होते. वास्तविक वेळोवेळी स्वच्छ करावेत, अशी या नाल्यांची स्थिती असते. मात्र, पावसाळ्यापूर्वी होते. एखादा मोठा पाऊस झाला, की नाल्याची सफाई किती गांभीर्याने केली जाते, याचे उत्तरच मिळते. त्यामुळे अशी सफाई ‘फ्लॉप शो’ ठरते. पिंपरी चिंचवड शहरही या बाबीपासून अलिप्त नाही. शहरातील ९८ टक्के नाल्यांची सफाई पूर्ण झाली आहे, असे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने माध्यमांना माहिती देताना सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र, शहरातील नालेसफाईची हकीगत काही वेगळीच आहे.
याबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे यांनी प्रसिद्धीस निवेदन दिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, ”पिंपरी चिंचवड शहरात नालेसफाई ही केवळ दिखावा व नौटंकी करून, नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करून, पैसे कमविण्याचे साधन बनले आहे. यात महापालिका अधिकाऱ्यांचाही प्रत्यक्ष संबंध असतो असा संशय निर्माण होण्यास वाव आहे. ठराविक अंतरावरील नाल्यातील गाळ काढून व नाला स्वच्छ करून, पाहणी केली जाते. यात पाहणीतील अधिकारीही ठेकेदाराला सामील होऊन, बनवाबनवी करून सकारात्मक अहवाल देतात. बिले निघाल्यानंतर टक्केवारीही लाटतात. हा आजवरचा अनुभव आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील मोठे व छोटे अशा सर्व नाल्यांच्या सफाईचे काम १५ मेपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती निर्माण होणार नाही. शहरातील ९८ टक्के नाल्यांची सफाई पूर्ण झाली आहे, असे महापालिकेचे प्रभारी आयुक्त व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी पाहणी दरम्यान भाष्य केले होते. तसेच कासारवाडी परिसर सोडून शहरातील सर्व नालेसफाई झाले असल्याचेही सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र, वाकड परिसरातील कस्पटेवस्ती येथील डायनेस्टी सोसायटी परिसरातील नाल्याची दुरावस्था काही वेगळीच माहिती देत आहे. काही दिवसांपूर्वी या बंदिस्त नाला करण्याच्या कामाचे आमदार जगताप व माजी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांनी भूमिपूजन केले होते. ते काम तर दूरच मात्र, या नाल्याची सफाई करण्यासही महापालिकेला वेळ नाही अन शहरातील नालेसफाई ९८ टक्के झाली असल्याचा कांगावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. महापालिकेच्या या नौटंकीचा निषेध करीत असल्याचे कस्पटे यांनी या पत्रकात म्हटले आहे.











