- शासनाने बंधनकारक केले म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंगचे फक्त नाटक?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मे २०२५) :- भविष्यात पाण्याची गरज लक्षात घेता पाण्याच्या बचतीसाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग योजना राबवणे गरजेचे आहे. पिंपरी-चिंचवड शहरात अनेक इमारतीमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग केल्याचे सांगितले जाते; मात्र त्याची आकडेवारी पालिकेच्या स्थापत्य विभागाकडेच उपलबध नाही. त्यामुळे नक्की रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविला जातो की तो फक्त कागदावरच आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ होत आहे. नवीन स्त्रोताचा शोध घेतला जात आहे. पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळावा आणि पिण्याव्यतिरिक्त पाण्याच्या वापरासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग योजना २००७ मध्ये अंमलात आणली. तीन गुंठ्यांपेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम केलेल्या इमारतीला रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक आहे. काँक्रीटचे रस्ते व वाढलेल्या इमारतींची संख्या यामुळे महापालिका हद्दीतील भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. शहरातील मोठमोठ्या इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग नसल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वाहून नाल्यामध्ये जाऊन मिळते. त्यामुळे भूजल पातळी कमी झाली आहे.
शहरातील पाण्याचे स्रोत नाहीसे होत चालले आहेत. प्राण्यांना आसरा घेण्यासाठी झाडे पुरेशी नाहीत. नद्यांचे रूपांतर नाल्यांमध्ये झाले आहे, पाणी अशुद्ध होऊन वेगवेगळी रसायने मिश्रित झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जलसंपत्ती आपण गमावली असून, या सर्व बाबींमुळे तापमान वाढ होत आहे.
शहरी भागातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही तिन्ही माध्यमातून रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रती उदासीनता दिसून येते. नागरिकदेखील आपल्या इमारतीमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी आग्रह धरत नाहीत. शासनाने बंधनकारक केले आहे, म्हणून रेनवॉटर हार्वेस्टिंग केल्याचे नाटक करतात. प्रत्यक्षात ते रेनवॉटर हार्वेस्टिंग नसते. पावसाचे सर्व पाणी ड्रेनेजमध्ये जाते असे जाणकारांचे मत आहे. तसेच प्रशासन फक्त कायदा केला आहे, म्हणून परवानगी देते, पण त्यांच्याकडे प्रशिक्षित असे मनुष्यबळ नाही. रेनवॉटर हार्वेस्टिंगचा अभ्यास करून त्या ठिकाणी जावून प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यानंतरच बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला जातो. मात्र, ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली जात नाही. या प्रकल्पासाठी काम करणारे सेवा देणाऱ्यांची संख्यादेखील खूपच कमी आहे.
रेनवॉटर हार्वेस्टिंग सेवा देणाऱ्यामध्ये अशी काही मंडळी घुसली आहेत. जी स्वतः यामध्ये तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून चुकीच्या पदध्तीने रेनवॉटर हार्वेस्टिंग केले जाते. पैसे मिळविण्यासाठी जोडधंदा म्हणून हा उद्योग केला जातो. मोठ्या इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक आहे. पण चुकीच्या पद्धतीने केलेल्या रेनवॉटर हार्वेस्टिंगचा कोणताही डेटा नसतो. रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उत्तमरित्या राबविला असेल तर तितक्या प्रमाणात आपल्याकडे भूजल पातळीत वाढ का नाही झाली ?
– उपेंद्र धोंडे, भूजल वैज्ञानिक, जलशक्ती मंत्रालय…
आपल्याकडे २००७ पासून तीन गुंठ्यांपेक्षा जास्त जागेत असणाऱ्या इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक कैले आहे. आम्ही प्रत्यक्ष जावून तपासणी करून त्यानंतरच बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देतो. पण त्याचा असा वेगळा डाटा आमच्याकडे नाही.
– मकरंद निकम (शहर अभियंता)…











