- मंदिर-मशीद बचाव समितीची महापालिकेकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मे २०२५) :- पिंपरी चिंचवड शहरातील चिखली कुदळवाडी परिसरातील १३ मंदिर आणि १९ मशीद तसेच इतर धार्मिक स्थळांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकाम काढून घेण्याच्या नोटीस देण्यात आलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख विरोधी राजकीय पक्षाचे प्रतिनिधी तसेच सामाजिक संघटनेच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, शिवसेनेचे मा. आमदार गौतम चाबुकस्वार, माजी नगरसेवक मारुती भापकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक शहराध्यक्ष इमरान शेख, काँग्रेस पक्षाचे विश्वनाथ जगताप, संभाजी ब्रिगेडचे धनाजी येळकर, सतीश काळे, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, उद्योजक नईम चौधरी, करीम पुना, शिवसेनेचे दस्तगीर मणियार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अजिज शेख, युवक काँग्रेसचे ओम शिरसागर, उद्योजक शकूर चौधरी आणि मोठ्या संख्येने महाविकास आघाडी तसेच पिंपरी चिंचवड मंदिर मस्जिद बचाव समितीचे सदस्य उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी “सध्या आयुक्त सुट्टीवर आहेत ते आल्यानंतर चर्चा केली जाईल तसेच कायदा विभागाच्या अधिकाऱ्यांनाही त्या चर्चेत सहभागी करून घेण्यात येईल” असे आश्वासन देऊन “जोपर्यंत आयुक्तांशी चर्चा होत नाही तोपर्यंत पुढील कुठलीही कारवाई करण्यात येणार नाही” असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.














