- यंदा २९ शाळांचा शंभर टक्के निकाल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मे २०२५) :- बारावीचा निकाल सोमवारी (दि. ५) दुपारी एकला जाहीर झाला. पिंपरी चिंचवड शहरात बारावीचा निकाल ९६.५५ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात ०.९ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येत आहे. यावर्षी १ हजार ४८४ मुले उत्तीर्ण झाले. तुलनेत ८ हजार ५९६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यंदा २९ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला, तर दुसरीकडे चिंचवडमधील चिंतामणी रात्रप्रशाला ज्युनिअर कॉलेजने सर्वाधिक कमी ४४. ४४ टक्के मिळवले आहेत. पुर्नपरीक्षार्थ्यांचा (रिपीटर) ७१.२३ टक्के निकाल लागला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातून १८ हजार ८०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात ९ हजार ९७९ मुले आणि ८ हजार ८२४ मुलींचा समावेश होता. १ हजार ९३३ मुले, ८ हजार ७९२ मुली असे एकूण १८ हजार ७२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ हजार ४८४ मुले आणि ८ हजार ५९६ मुली असे मिळून १८ हजार ८० परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात ९५.४७ टक्के मुले, तर ९७.७७ टक्के मुलीनी बाजी मारली आहे.
निकाल पाहण्यासाठी शहरातील काही शाळांमध्ये स्क्रीनवर पाहण्याची सोय केली होती. निकाल पाहताच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जल्लोष सुरू केला अन् सगळीकडे एकच जोश निर्माण झाला, हसरे चेहरे आणि आनंदी चेहऱ्यांनी महाविद्यालयाचे कॅम्पस फुलून गेले होते. एकूणच यंदाच्या निकालामुळे सगळ्याच महाविद्यालयात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान, तब्बल तीन तास शिक्षण मंडळाचे संकेतस्थळ हँग असल्यामुळे निकाल पाहण्यास अडचण निर्माण झाली होती.
गेल्यावर्षी रिपीटर विद्यार्थ्यांचा ७५.०९ टक्के निकाल लागला होता, यावर्षी त्यांचा ७१.२३ टक्के निकाल लागला आहे. यात १ हजार ३३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ८३० मुले आणि ५०१ मुलींचा समावेश होता. ८१८ मुले आणि ४९६ मुली असे एकूण १ हजार ३१४ विद्यार्थानी परीक्षा दिली. त्यापैकी ५७४ मुले आणि ३६२ मुली असे एकूण ९३६ पुर्नपरीक्षार्थी पास झाले आहेत. ७०.१७ टक्के मुले आणि ७२.९८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.










