न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मे २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांची बदली करण्यात आली आहे. त्याबाबत उपसचिव प्रियांका छापवाले-कुलकर्णी यांनी सोमवारी (दि. ५) आदेश काढले आहेत.
उपजिल्हाधिकारी असलेले विठ्ठल जोशी यांची ४ एप्रिल २०२२ मध्ये प्रतिनियुक्तीने महापालिकेत उपायुक्तपदी नियुक्ती केली होती. त्यांनी महापालिकेत रुजू झाल्यानंतर क्रीडा, दक्षता व नियंत्रण, सामान्य प्रशासन विभागात चांगले काम केले. महापालिकेत तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. ते मूळ महसूल विभागातील असल्याने त्यांना तिकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जोशी यांच्या जागी महिला व बालकल्याण विकास आयुक्तालयाच्या सहायक आयुक्त ममता शिंदे यांची प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे. त्या त्रिपुरा राज्यातील माहिती विभागात उपसंचालक पदावर कार्यरत होत्या. त्यांची प्रतिनियुक्तीने महाराष्ट्रात सहायक आयुक्तपदी बदली करण्यात आली. त्यानंतर आता उपायुक्त म्हणून महापालिकेत प्रतिनियुक्तीवर बदली केली आहे. त्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत.










