न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मे २०२५) :- महापालिकेतील समाज विकास विभागातील तत्कालीन प्रशासन अधिकारी सुचिता पानसरे यांनी बायोमेट्रिक हजेरी न लावताच पगार घेतल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांना समाज विकास विभागाचे प्रमुख सहायक आयुक्त तानाजी नरळे यांनी नोटीस बजावत सात दिवसांत खुलासा मागविला आहे.
खुलासा समाधानकारक नसल्यास कारवाई केली जाईल, असेही नोटीसमध्ये बजावले आहे. याबाबत मनसेचे उपाध्यक्ष राजू भालेराव यांनी तक्रार केली होती.
त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. समाज विकास विभागात प्रशासन अधिकारी पानसरे या जानेवारी २०२४ पासून कार्यरत आहेत. ऑक्टोबर २०२४ दरम्यान निवडणुकीच्या कामकाजासाठी त्यांना बायोमेट्रिकमधून सूट दिली होती. मात्र, २४ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०२४ दरम्यान ३ दिवसांची रजा सोडता बायोमेट्रिक न करताच ३५ दिवसांचा पगार घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.











