न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मे २०२५) :- भाजप शहराध्यक्षपद बदलण्याच्या जोरदार हालचाली सध्या वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत. पक्षातील इच्छुकांनी त्यासाठी गुपचूप जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मीच होणार अध्यक्ष या भावनेने बाशिंग बांधलेल्यांच्या पदरी मात्र निराशा येणार असल्याचे संकेत आहेत.
सध्या पक्षामध्ये संघटनात्मक निवडणुका सुरू झाल्या आहेत. शहरातील १४ मंडलांसाठी नवीन अध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता भाजप शहराध्यक्ष पदाची कार्यवाही देखील सुरू होणार आहे. भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप यांना अध्यक्षपदासाठी दीड वर्षांचाच कार्यकाळ मिळाला आहे.
पक्षात राज्य पातळीवर पदाधिकारी बदलाचे वारे वाहत असताना गेल्या महिन्यापासून शहराध्यक्ष बदलाच्या चचदिखील सुरू झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून या चर्चेने जोर पकडला आहे. जगताप यांच्यापूर्वी शहराध्यक्षपदाची जबाबदारी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे होती. त्यामुळे या दोन्ही आमदारांनंतर आता शहराध्यक्षपदाची जबाबदारी कोणाला मिळणार, याकडे पक्षाचरोबरच इतर पक्षातील नेत्यांचेही लक्ष लागून राहिले आहे.
महापालिका निवडणूक तोंडावर…
आगामी महापालिका निवडणुक सप्टेंबर अखेर पार पडणार आहे. त्यामुळेच निवडणूकीच्या तोंडावर सर्वसमावेशक तसेच शहरावर कमांड असणारा नेता शहराध्यक्ष म्हणून असावा, या मागणीसाठी शहरातील नेते, कार्यकर्ते गुपचूप मुंबई दौरे करून नेत्यांना विनवणी करीत आहेत. महापालिकेसाठी इच्छुक असणारेही भविष्यातील तिकिटासाठी आपल्या मर्जीतील नेत्यासाठी फिल्डींग लावत आहेत.
भाजप शहराध्यक्ष पदासाठी पक्षामध्ये स्थानिक पातळीवर माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्यासह ७ ते ८ जण इच्छुक आहेत. त्याचप्रमाणे, विद्यमान शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप यांना कमी कालावधी मिळाला असल्याने आगामी महापालिका निवडणुकांपर्यंत त्यांनाच पुन्हा या पदावर कायम ठेवण्याचाही विचार होऊ शकतो. इच्छुकांनी मात्र आपापल्या परीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपचे उमेदवार व शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या विरोधात काहींनी बंड पुकारले होते. प्रदेशाध्यक्षांकडे तक्रारी करण्याबरोबरच निवडणुकीत असहकार पुकारण्याचा इशारा दिल्याने हे बंड शमविण्यासाठी शत्रुघ्न काटे यांना शहर कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आले. त्यांना शहराध्यक्षपदाचा शब्द दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, भाजप पक्षामध्ये बंडाला थारा दिला जात नाही. त्यामुळे ही निवडणुकीपुरतीच तडजोड होती की काटे यांच्या बंडासमोर पक्ष झुकणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.











