न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मे २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने १५ मे ते १५ जून या दोन महिने कालावधीत शहरातील सर्व होर्डिंगवर जाहिरात न लावता, ती रिकामी ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याला होर्डिंगधारकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. शहरातील बहुतेक भागांतील होर्डिंगवर जाहिराती झळकत आहेत. वारंवार आवाहन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेनेचे आपला निर्णय फिरवला आहे. आता केवळ २५ मे ते ७ जून असे १४ दिवसांसाठी हा निर्णय मर्यादित करण्यात आला आहे.
शहरातील जाहिरात होर्डिंगचालक आणि आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक ९ एप्रिलला झाली. वादळी वारे, अवकाळी पावसापुळे होर्डिंग कोसळून अपघाताची शक्यता असते, त्यात जीवित व वित्त हानी होऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी १५ एप्रिल ते १५ जून असे दोन महिने होर्डिंगवर जाहिरात बॅनर न लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्या काळात होर्डिंग रिकामे ठेवण्यात येणार होते. त्या निर्णयास होर्डिंगचालकांनी सहमती दिली होती. मात्र, त्या मुदतीमध्ये शहरातील बहुतांश होर्डिंगवर जाहिरात झळकत आहेत.
गृहप्रकल्प, राजकीय नेते, कार्यक्रम, निमंत्रण पत्रिका, क्रीडा स्पर्धा, वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा जाहिराती झळकत आहेत. त्याबाबत महापालिकेवर टीका झाल्यानंतर आकाशचिन्ह व परवाना विभागाने सोमवारी (दि. ५) होर्डिंगचालकांची उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यानी बैठक घेतली, या काळात होर्डिंगवरील जाहिरातीसाठी मोठे उत्पन्न मिळते त्यामुळे जाहिरात न लावल्यास उत्पन्न बुडते असा सूर त्यांनी आवळला. त्याला सहमती देत दोन महिन्यांची मुदत केवळ २ आठवड्यांवर आणण्यात आली आहे. २५ मे ते ७ जून या १४ दिवसांत होर्डिंगवर जाहिराती न लावता ते रिकामे ठेवले जातील, असा निर्णय घेण्यात आला आहे.











