न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. ०९ मे २०२५) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन गटात फाटाफूट झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या पक्षाचे काही आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्यास इच्छूक असल्याची कबुली शरद पवारांनी दिली आहे. पुन्हा एकत्र येण्याबाबत पक्षात दोन वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे मान्य करतानाच आपला पक्ष इंडिया आघाडीसोबतच राहील आणि भाजपविरोधात लढत राहील, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी मांडली आहे.
एका अग्रगण्य इंग्रजी दैनिकाला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत पवारांना या विषयावर प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यांनी ही भूमिका मांडली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर, संसदेत विरोधी पक्षात बसायचे कि नाही याचा निर्णय तिने घ्यायचा आहे, असे उत्तर शरद पवार यांनी दिले आहे. पक्षाचे काही आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्यास इच्छुक असल्याची पवारांची माहिती
दरम्यान, शरद पवार यांच्या या मुलाखतीवर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आशेचा किरण दाखवला आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच होईल. हे मनोमिलन लवकरात लवकर व्हावे, अशीच इच्छा आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असतील तर मी मध्यस्थीसाठी तयार आहे. पण अजित पवार हे पवारसाहेबांच्या घरातच वाढले आहेत. त्यामुळे त्यांच्या मनोमिलनासाठी मध्यस्थाची गरज आहे असे वाटत नाही, असेही भुजबळ यांनी सांगितले.
आमच्या पक्षाचा विचार केल्यास आमच्या पक्षात दोन मतप्रवाह आहेत. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसपक्षासोबत आम्ही जायला हवे, असा एक मतप्रवाह आहे. मात्र दुस-या गटाला असे वाटते की कोणत्याही परिस्थितीत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या आम्ही इंडिया आघाडीतच राहून पुढील वाटचाल करावी, असे दुस-या गटाचे मत आहे.











