- माजी नगरसेवकांसह इच्छुकांमध्ये संचारला उत्साह…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२५) :- आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत. मात्र, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. ज्या ठिकाणी तुल्यबळ परिस्थिती आहे, त्या ठिकाणी मित्र पक्षाला जास्त जागा सोडता येणार नाहीत. त्यामुळे शक्य तिथे महायुती करून अपवादात्मक ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढू आणि निवडणुकीनंतर पुन्हा एकत्रित येऊ, असे स्पष्ट करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.
तब्बल तीन वर्षांपासून रखडलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुका येत्या चार महिन्यांत होणार असल्याने माजी नगरसेवक तसेच, इच्छुकांमध्ये उत्साह संचारला आहे. नव्या जोमाने प्रभागात कामास लागण्यास चाचपणी अनेकांकडून सुरू करण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी स्वागत केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने महापालिका निवडणुकीचे ४ आठवड्यांत नोटिफिकेशन काढण्याचे आदेश दिले आहेत. तर, निवडणूक प्रक्रिया ४ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुका २०२२ च्या आधीच्या प्रभाग रचनेनुसार म्हणजे फेब्रुवारी २०१७ ला झालेल्या निवडणुकीप्रमाणे सप्टेंबर २०२५ पर्यंत होतील, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने थेट निवडणुका घ्या, म्हणून आदेश दिल्याने आता निवडणुका लांबणीवर न पडता त्या होतील, असा विश्वास इच्छुकांमध्ये निर्माण झाला आहे. परिणामी, माजी नगरसेवकांसह पदाधिकारी व इच्छुकांचा उत्साह संचारला आहे.
इच्छुकांचे खबरदारी म्हणून पत्नीसह प्रमोशन…
महापालिका निवडणुका होत नसल्याने माजी नगरसेवकांमध्ये कामाचा उत्साह कमी झाला होता. मात्र, प्रभागातील संपर्क सोशल मीडियाद्वारे कायम ठेवला होता. छोटे-छोटे कार्यक्रम व उपक्रम घेतले जात आहेत. महापालिका निवडणुकीत प्रभाग महिला वर्गास सुटल्यास तिकीट कापले जाऊ नये, म्हणून माजी नगरसेवकांनी पत्नीलाही मैदानात उतरवले आहे. फ्लेक्स व जाहिरातीवर आपल्यासोबत पत्नीचे छायाचित्रे ठळकपणे वापरले जात आहे. त्यामाध्यमातून पत्नीचे प्रमोशन केले जात आहे. आपले वरिष्ठ नेते व शहराध्यक्षांशी संपर्क साधत, न्यालयाच्या आदेशाचे स्वागत केले आहे. अनेकांनी आपल्या प्रभागांत जोमाने काम करण्याबाबत नियोजन आखणीस सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांशी संपर्क साधत, कामास लागण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. अनेक वर्षांपासून निवडणुका वारंवार लांबणीवर पडत होत्या. लोकसभा, त्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर महापालिकेच्या निवडणुका लागतील, असे सांगितले जात होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणीच्या वेळेस पुढील तारीख दिली जात असल्याने निवडणूक पुढील ढकलली जात असल्याने इच्छुक हिरमुसले होते. अनेकांनी प्रभागातील काम जवळजवळ बंद केले होते. केवळ पक्षाच्या कार्यक्रमात बहुतांश माजी नगरसेवक व इच्छुक हजेरी लावताना दिसून येत होते. निवडणुकीवरील सावट आता न्यायालयानेच दूर केल्याने सर्वांनी निर्माण झालेली मरगळ झटकली आहे. सोशल मीडियावर या निर्णयाचे स्वागत करून लढण्यास तयार असल्याचे पोस्ट अनेकांनी केल्या आहेत. त्यांचे समर्थक व कार्यकर्ते त्या पोस्ट व्हायरल करीत आपल्या नेत्यास बळ देत आहेत.
अनेकांची जनसंपर्क कार्यालये बंद…
महापालिका निवडणुका वारंवार लांबणीवर पडत असल्याने शहरातील अनेक माजी नगरसेवकांनी आपले जनसंपर्क कार्यालये बंद केली आहेत. विविध कार्यक्रमांच्या वर्गणी, पावत्या आदींमुळे त्यांचे आर्थिक गणितेही बिघडले होते. तसेच, कार्यालयातील ⁰कर्मचारी तसेच, कार्यकर्ते सांभाळणे अवघड होऊन बसले होते. मात्र, काही मोजक्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागात काम कायम ठेवत जनसंपर्क कायम ठेवला होता.
प्रशासकीय राजवटीत तीन मोठ्या निवडणुका झाल्या…
महापालिका प्रशासकीय राजवटीच्या काळात चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक, लोकसभा निवडणूक त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली. त्या तीन निवडणुकीत शहरातील माजी नगरसेवकांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांना झोकून देऊन पक्षाचे तसेच, मित्रपक्षाचे काम केले. आ. लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड पोटनिवडणूक झाली. त्या निवडणुकीनंतर पालिका निवडणूक होणार असे सांगितले गेल्याने कार्यकत्यांनी जीव तोडून काम केले. त्यानंतर लोकसभा निवडणूक, पाठोपाठ विधानसभा निवडणूकही झाली. त्यानंतर पालिका निवडणूक होतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार स्पष्ट केले. अखेर, पालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत निवडणुका होतील, असे दिसत आहे.











