न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहुगाव (दि. १६ मे २०२५) :- तीर्थक्षेत्र देहूगाव हद्दीत इंद्रायणी नदी पात्रालगत होणाऱ्या विविध कामांमुळे नदीचे पात्र अरुंद होत आहे. नदी पात्रात पडणारा राडारोडा तसेच निळ्या आणि लाल पूररेषेमध्ये होणारी अतिक्रमणे, बांधकामे यामुळे नदीचे पात्र अरुंद होत असून नैसर्गिक प्रवाह धोक्यात आला आहे. यासह जलचरांना धोका निर्माण झाला असून नदीचे पात्र अरुंद झाल्यास पावसाळ्यात नदीपात्रालगतच्या परिसरात पूर येण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नदीपात्रात टाकला जाणारा राडारोडा हटवून, बेकायदेशीर बांधकामे पाडून नदीपात्र ‘जैसे थे’ करण्याची आणि नदीची नांगरट करून प्रवाह रुंद करण्याची मागणी होत आहे.
मावळ, हवेलीसह खेड तालुक्याला सुजलाम, सुफलाम आणि समृद्ध बनविणाऱ्या पवित्र इंद्रायणी नदीचे पात्र सध्या अतिक्रमणांच्या विळख्यात अडकले आहे. नदीजवळील जागांचे भाव गगनाला भिडल्यामुळे हळूहळू नदीच्या नैसर्गिक प्रवाहालाच धक्का पोहचवून बांधकामे होत आहेत. नदी पात्रालगत असणाऱ्या निळ्या आणि लाल पूररेषेच्या अंतर्गत भागातील जमिनीवर मोठ्या प्रमाणात भराव टाकून जमिनीची विक्री होत असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे. देहूगाव जवळ अनेक ठिकाणी इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात राडारोडा, मुरूम, दगड-गोट्यांचा भराव टाकून जागा बनवून अतिक्रमण करीत बांधकामे झाली आहेत, तर आजमितीस अनेक बांधकामे सुरू आहेत.
नदीपात्र अरुंद करण्याचा ‘घाट’ ?
पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वतीने देहूच्या कापूर ओढ्यातील पाणी इंद्रायणी नदीमध्ये मिसळणाऱ्या भागापासून ते मुख्य मंदिरादरम्यान इंद्रायणी नदी पात्रालगत दगडी घाट बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रातच दगड गोटे, मुरूम, माती राडारोड्यांचा भराव टाकून घाटाचे काम करण्यात येत आहे. तर भामा आसखेड धरणातून पिंपरी-चिंचवडकरांना पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या पाइपलाइनचेही काम सुरू आहे. या सर्व कामांमुळे नदी पात्र अरुंद होत असून भविष्यात येथे पूर स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.
इंद्रायणी नदी पात्रालगत दगडी घाट बांधण्याचे काम सुरू असल्याने समतोल काढण्यासाठी भराव टाकला आहे. काम झाल्यावर संपूर्ण भराव काढण्यात येईल. नदीचे पात्र अरुंद केले जाणार नाही.
– विवेक विसपुते, उपअभियंता, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण..पीएमआरडीएचे नदी घाट सुशोभीकरण काम सुरू आहे. नदीला हानी न पोहचविता काम करण्याची परवानगी दिली आहे. नदीपात्रात भराव टाकून अतिक्रमणे करणाऱ्या आणि निळ्या व लाल रेषांच्या अंतर्गत बांधकाम करणाऱ्या संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्था, देहू नगरपंचायत, ग्रामपंचायत यलवाडी तसेच पीएमआरडीला सूचना दिल्या आहेत. कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना आहेत.
– किशोर चव्हाण, सहाय्यक अभियंता, मोशी पाटबंधारे…तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत इंद्रायणी नदी पात्रावर दोन नवीन पूल तयार करण्यात आले, तसेच मुख्य मंदिरापासून गाथा मंदिर दरम्यान घाटाचे काम करताना नदीपात्रामध्ये भराव टाकण्यात आला होता. मात्र नदी पात्रात टाकण्यात आलेला राडारोडा, भराव पूर्णपणे काढण्यात आला नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली आहे. इंद्रायणी नदीची नांगरट होण्याची गरज आहे. नदी पात्रातील राडारोडा, गाळ काढून नांगरट केल्यास पात्रातील छिद्रे मोकळे होऊन भूगर्भात पाण्याचा साठा वाढेल, त्यामुळे परिसरातील कूपनलिकांच्या (बोरवेल) पाण्याची पातळी वाढेल.











