न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२५) :- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड स्टेशन येथे मंगळवारी (दि. १३ मे) रात्री उशिरा निर्माणाधीन मेट्रो पिलरचा लोखंडी सांगाडा कोसळला. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. रात्रीची वेळ आणि रस्त्यावर वर्दळ नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
पिंपरी ते निगडीदरम्यान मेट्रोची नवीन उन्नत मार्गिका उभारली जात असून, त्यासाठी पिलर उभारणीचे काम काही महिन्यांपासून सुरू आहे. चिंचवड स्टेशन येथे मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास मेट्रोसाठी उभारल्या जात असलेल्या पिलरचा लोखंडी सांगाडा कोसळला. सांगाडा ग्रेड सेपरेटरच्या बाजूने कोसळल्यामुळे जीवितहानी झाली नाही. पडलेला सांगाडा तातडीने हलविण्यात आला.














