- नागरिक आणि पर्यावरणवादी संघटनांना यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२५) :- पिंपळे निलख स्मशानभूमी परिसरात सुरू असलेल्या मुळा नदी सुधार प्रकल्पास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. नदीकाठ सुशोभीकरण नको, पुनरुज्जीवन करा, या मागणीसाठी पर्यावरणप्रेमींनी आंदोलन सुरू केले होते.
महापालिकेच्या सीमेवर असणाऱ्या मुळा नदी सुशोभीकरणाच्या घाट घातला होता. पहिल्या टप्प्यांतर्गत वाकड बायपास ते सांगवी पूलदरम्यान नदीकाठ सुशोभीकरणासाठी भराव टाकणे आणि बांधकाम सुरू केले होते. हा प्रकल्प पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने राबविला जात आहे. त्यानुसार बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला काम दिले होते.
काम सुरू झाल्यानंतर पिंपळे निलख येथील स्मशानभूमीजवळील कामाबाबत नागरिक आणि विविध पर्यावरणवादी संघटनांनी आक्षेप नोंदवले. त्यांनी नदीमध्ये टाकला जाणारा भराव आणि नदीकिनारी होणाऱ्या पर्यावरणीय हानीबाबत चिंता व्यक्त केली होती. वेळोवेळी शहरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींकडून आंदोलन करून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. प्रकल्पाविरोधात पर्यावरण प्रेमी पिंपळे निखल येथे मुळा नदीमध्येही उतरले होते. त्यानंतर जलसंपदा विभागाने तीन नोटिसा दिल्या होत्या. वृक्षतोडीविषयी गुन्हे दाखल केले होते. तक्रारी आल्यानंतर या भागातील कामाचा फेरविचार करण्यासाठी महापालिकेने तांत्रिक समितीकडून नव्याने अहवाल मागवला आहे. वृक्षतोड, भराव आणि तक्रारींची चौकशी होणार आहे.
महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी कंत्राटदारास काम स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. पिंपळे निलख स्मशानभूमीजवळील काम थांबविण्यात आले असून, पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही कामे करण्यात येऊ नये, असे आदेशात म्हटले आहे. मुळा नदी सुधार प्रकल्पाला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्यानंतर नदी बचाव आंदोलनातील कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शहरातील नागरिकांनी आणि पर्यावरण प्रेमींना यामुळे दिलासाही मिळाला आहे.















