- महाआरक्षणाच्या विरोधात ग्रामस्थ एकवटले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०२५) :- बांगलादेशी रोहिंग्यांच्या नावाखाली अतिक्रमण कारवाईमुळे कुदळवाडी परिसरातील नागरिकांचे कंबरडे मोडले. टीपी स्किमचे भूत ग्रामस्थांच्या कडव्या विरोधाने उतरविले. त्यानंतर डीपीमध्ये आरक्षणे प्रस्तावित आहेत, त्यामुळे चिखलीकरांनी महापालिके विरोधात बाह्या सावरल्या आहेत. बैठकीत विरोध केला आहे. आम्ही एक इंचही जमीन देणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.
नवीन डीपीमध्ये चिखली आणि जाधववाडीतील नागरिक अडचणीत आले आहेत. १६ मे ला जाहीर डीपीत संपूर्ण जाधववाडी, रोकडे वस्ती अगदी रिव्हर रेसिडन्सीपर्यंतच्या १७५ एकर क्षेत्रावर सुपर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह कम कमर्शियल कॉम्प्लेक्स अर्थात प्रशासकीय व व्यापार संकुलाचे महाआरक्षण टाकले आहे. आर म्हणजे निवासी आरक्षणाचे शासकीय कार्यालय, व्यापार संकुल असे आरक्षण टाकल्याने गावकरी संतापले आहेत. चिखली ग्रामस्थांनी डीपीविरोधात बैठक घेत महापालिकेला विरोध दर्शविला.
विकास आराखड्यात जाधववाडीत सर्व जमीन महाआरक्षणात टाकल्याने सर्व भूमिपुत्रांनी एकत्र येत तीव्र नाराजी व्यक्त केली. चिखली गावामध्ये महापालिका प्रशासनाने लादलेल्या नवीन डीपी प्लॅन संदर्भात ग्रामस्थांनी विरोध नोंदवला. ‘आमच्या जमिनी थोड्याच आहेत. मुळात आरक्षणाचा हेतू समजला नाही, त्याचे कारण काय, त्याचा मोबदला काय मिळणार तेसुद्धा समजलेले नाही. जुन्याच डीपीतील आरक्षणे अगोदर विकसित करता आलेली नाहीत, त्यात आता हे मोठे आरक्षण टाकून आम्हाला भूमिहीन करण्याचा डाव आहे. यापूर्वी टेल्को, रेडझोन, एमआयडीसी, प्राधिकरणात जमिनी गेल्यात. आमचे निवासी आहे ते निवासीच राहू द्या, आम्ही आमचे विकसित करू. जोवर आरक्षण निघत नाही तोवर हा लढा सुरूच ठेवणार आहोत, असे सांगत गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला.