न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०२५) :- चिखली, रिव्हर रेसिडन्सी येथील इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेतील अनधिकृत बांधकामांना कारणीभूत ठरलेल्या विकसक, बांधकाम व्यावसायिक, लोकप्रतिनिधी, स्थानिक नेते आणि महापालिकेचे संबंधित अधिकारी यांच्याविरुद्ध फसवणूक व फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने केली आहे. महापालिकेच्या सर्व बीट निरीक्षकांच्या मालमत्तांचीही चौकशीची मागणीही करण्यात आली आहे.
पक्षाचे शहर उपाध्यक्ष धम्मराज साळवे यांनी महापालिका आयुक्त व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या संदर्भात तक्रार केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत सुमारे ७ हजार २४५ चौरस मीटर जागेत ३६ अनधिकृत अलिशान बंगले उभारले होते. ही बांधकामे पूर्णपणे बेकायदेशीर असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने कारवाई करीत ते बंगले भुईसपाट केले. निळ्या पूररेषेत सुमारे ७ हजार २४५ चौरस मीटर जागेत ३६ अनधिकृत आलिशान बंगले उभारले होते.
या प्रकरणात केवळ कारवाई करून प्रशासनाची जबाबदारी संपत नाही. या प्रकारामध्ये नागरिकांची जी फसवणूक झाली आहे. त्यामुळे संबंधित विकसक, बांधकाम व्यावसायिक, लोकप्रतिनिधी, स्थानिक नेते, महापालिकेचे अधिकारी व बीट निरीक्षक यांच्याविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे व शासकीय जबाबदारी झटकण्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. महापालिकेच्या सर्व बीट निरीक्षकांची मालमत्ता व आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र व सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी साळवे यांनी केली आहे.

















