न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २८ मे २०२५) :- राज्यभरात अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. यंदा प्रथमच संपूर्ण राज्यात केंद्रीय, ऑनलाइन पद्धतीने ती राबविली जात आहे. यात काही तांत्रिक अडचणी येत होत्या. राज्य मंडळाने तातडीने उपाययोजना करून सोमवारपासून (दि. २६) ही प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे.
राज्यातील उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांना https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावरून घरबसल्या राज्यातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. प्रवेश अर्ज करण्याची अंतिम मुदत ३ जून आहे.
विशेष म्हणजे राज्य मंडळाने वरील अधिकृत संकेतस्थळावर करिअर पाथ (Career Path) अशी एक लिंक दिली आहे, ज्यामध्ये जवळपास १५० पेक्षा जास्त करिअर आणि संबंधित अभ्यासक्रमाची माहिती आहे. करिअर निवडीबाबत विद्यार्थी आणि पालकांना याचा निश्चित फायदा होणार आहे.
दरम्यान, विद्यार्थी नोंदणी बुधवारीच (दि.२१) सुरू केली होती. परंतु, तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची गैरसोय झाला होती. याची दखल घेत शिक्षण विभागाने संकेतस्थळात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम हाती घेतले होते. पहिल्या नियमित फेरीसाठी विद्यार्थी नोंदणी आणि पसंतीक्रम भरण्याची सुविधा सोमवारी सकाळी अकरा वाजेपासून सुरू झाली आहे.
अशी राबविली जाणार फेरी
सोमवार (दि. २६) ते येत्या मंगळवारपर्यंत (दि. ३ जून) विद्यार्थी नोंदणी व महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम निश्चित. तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी ५ जून रोजी जाहीर होणार. त्यानंतर दोन दिवस हरकती नोंदविता येतील. अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी ८ जून रोजी जाहीर केले जाणार. महाविद्यालयनिहाय विद्यार्थी वाटप यादी १० जून रोजी जाहीर होईल. विद्यार्थ्यांच्या लॉगइनमध्ये महाविद्यालय वाटप, कट ऑफ जाहीर होणार. मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, प्रवेशनिश्चिती करणे आदी प्रक्रिया ११ ते १८ जूनदरम्यान पूर्ण करण्यात येणार आहे.