न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. २८ मे २०२५) :- गेले तीन दिवस राज्याच्या दौऱ्यावर असलेले भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेतला आणि मुंबई, ठाणे व पुणे या शहरात स्वबळावर निवडणुका लढविण्याबाबत चाचपणी करण्याच्या सूचना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
शाह हे मुंबईत असल्याची संधी साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सकाळी त्यांची ‘सह्याद्री’ अतिथिगृहावर भेट घेतली. या भेटीत शिंदे यांनी मुंबईतील जवळपास १०७ जागांची मागणी केल्याचे सांगण्यात आले. या भेटीत राज्यातील काही महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली.
मुंबईत २२७ प्रभाग असून, त्यातील जवळपास १०७ प्रभागांत आपल्याकडे उमेदवार तयार असल्याची माहिती शिंदे यांनी शाह यांना दिल्याचे कळते. शाह यांनी शिंदे यांचे म्हणणे ऐकून घेतले मात्र कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही, असे सांगण्यात आले.
अजित पवार गटाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मंगळवारी अमित शाह यांची सह्याद्रीवर भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये २० मिनिटे चर्चा झाली. दोघांमधील चर्चेचा तपशील समजू शकला नसला तरी दोघांमध्ये राज्यातील राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. ही सदिच्छा भेट होती, असे पक्षाकडून सांगण्यात आले.












