- देहूफाटा परिसरात कामगारांची वाट बिकट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. २८ मे २०२५) :- श्री क्षेत्र देहूगाव ते तीर्थक्षेत्र भंडारा डोंगराकडे येलवाडीमार्गे जाणारा रस्ता व तळेगाव-चाकण रस्त्यावरील देहूफाटा परिसरातील रस्त्यांची खड्यांमुळे चाळण झाली आहे. या रस्त्याने प्रवास करणाऱ्या भाविक, कामगारांना वाहने चालविताना खड्डे चुकविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.
देहूगाव ते तळेगाव चाकण मार्ग हा केवळ ३ किलोमीटरचा रस्ता व येलवाडी गाव प्रवेशद्वार कमान ते भंडारा डोंगर पायथा हा मधून जाणारा रस्ता मोठ्चा प्रमाणात उखडला आहे. सध्या मान्सूनपूर्व पाऊस व चक्रीवादळामुळे पाऊस पढ़त आहे. या मार्गावर पाणी साचत असून, रस्त्याला मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. जाधववाडी धरणावरून पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या, त्यावेळी या मार्गाची डागडुजी केली होती. त्यानंतर सातत्याने या रस्त्यावर खड्डे पडत आहेत.
सध्या पाऊस पडत असल्याने या मार्गावरील रस्त्यांवरील खड्डे अधिकच वाढले आहेत. याच मार्गाने पालखी सोहळ्यासाठी येणारे भाविक संत भागीरथी माता व श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर दर्शनासाठी जात असतात. या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. वाहनचालकांना खड्यांचा अंदाज येत नसून वाहने आदळून नुकसान होत आहे. शिवाय लहान-मोठे अपघातही घडत आहेत. त्यामुळे या रस्त्याची पालखी पूर्वी तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.
तळेगाव चाकण महामार्ग कृती समिती अध्यक्ष नितीन गाडे तसेच ग्रामस्थांनी या मार्गावर डांबरीकरण करून हा रस्ता पूर्ववत करावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे वाहतुकीवरील ताण घटणार आहे.












