न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि चिंचवड फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने २९ ते ३१ मे २०२५ याकाळात ‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवा दरम्यान सकाळी १० ते रात्री ८ यावेळेत आकुर्डी येथील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह आणि चिंचवड मधील छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा फुले स्पर्धा परीक्षा केंद्र येथे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तब्बल ९० चित्रपट, लघुपट, माहितीपट, अॅनिमेशन चित्रपट मोफत दाखवण्यात येणार आहेत. शहरातील जास्तीतजास्त नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
महोत्सवाचे उद्घाटन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे. तर, केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती या महोत्सवाला असणार आहे. तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची देखील प्रमुख उपस्थिती असणार आहे. खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, विधान परिषद सदस्य अमित गोरखे, उमाताई खापरे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, रोहित पवार, माजी आमदार विलास लांडे हे देखील या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत.
‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५’ चे व्यवस्थापन मुंबा फिल्म फाउंडेशन करत असून पिंपरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे देखील या महोत्सवासाठी सहकार्य करीत आहे. या महोत्सवाचा उद्देश केवळ दर्जेदार चित्रपट सादर करणे नाही, तर युवा पिढीला प्रेरणा देणे, सामाजिक भान निर्माण करणे आणि पिंपरी चिंचवड शहराचे नाव जागतिक चित्रपट नकाशावर अधोरेखित करणे हे आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.












