- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती..
- युवकांसह समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २९ मे २०२५) :- भाजपा युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि. ३०) रोजी पुणे शहरात ‘युवा प्रेरणा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे, अशी माहिती भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषद आमदार व भाजपा महाराष्ट्र प्रदेश महासचिव विक्रांत पाटील, पुणे शहर भाजपा अध्यक्ष धीरज घाटे, आ. सिद्धार्थ शिरोळे, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.
प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी पत्रकात म्हटले आहे की, ”पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी संपूर्ण भारत वर्षांत अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले. त्याचप्रमाणे त्यांनी लोकांना रोजगार निर्माण व्हावा यासाठी औद्योगिक धोरण आखलं, अनेक प्रसिद्ध हिंदू मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला. यासह त्यांनी अनेक उल्लेखनीय कार्य केलेली आहेत. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभरामध्ये विविध उपक्रम सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या जयंतीनिमित्त समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. दरम्यान वेशभूषा स्पर्धेचेही सकाळी दहा ते दोन या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. त्याचा पारितोषिक वितरण सोहळा देखील यावेळी होणार आहे. या उपक्रमांमधून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींचे कार्य आणि आदर्श समाजापर्यंत पोहोचवण्याचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे युवकांसह समाज बांधवांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन अनुप मोरे यांनी केले आहे.











