न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२५) :- महापालिकेच्या प्रारूप विकास आराखड्चात नद्यांची निळी आणि लाल रेषा दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे या रेषेत बाधित कोण, याचा शोध नागरिक घेऊ लागले आहेत. पवना नदीची निळी रेषा पिंपरी रेल्वेलाइन आणि जिजामाता रुग्णालयापर्यंत पोहोचली आहे. नदीकाठच्या मोकळ्या जागांवर आरक्षण टाकल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पिंपरीचा बहुतांश भाग एमआयडीसी आणि लष्करच्या डेअरी फार्मसाठी आरक्षित झाला. मोजकीच जागा शिल्लक राहिलेल्या या परिसरावर आता आरक्षण टाकले आहे. एम्पायर काळेवाडीपासून पिंपरीचे क्षेत्र सुरू होते. पवना नदीची पुढे डेअरी फार्मपर्यंत हद्द आहे. दुसरीकडे भोसरी आणि चिंचवड एमआयडीसी सीमेपर्यंत पिंपरीचा विस्तार आहे. नदीची लाल रेषा रेल्वे रुळाच्या पलीकडे आहे. निळ्या रेषेने २५ टक्के क्षेत्र बाधित आहे. निळी रेषा जिजामाता रुग्णालय, म्हाडाजवळील प्ले-ग्राउंडपर्यंत पोहोचली आहे. नाल्यांच्या कडेला असणारे हिरवे क्षेत्र गायरान झाले आहे. पिंपरीतील पूर्वी शेती असणाऱ्या भागात रहिवासी झोन प्रस्तावित केला आहे.
पिंपरीमध्ये प्राथमिक शाळा, मैदाने, प्रसूतिगृह, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, स्मशानभूमी घाट, भाजी मंडई, महामार्गावर मेट्रो पार्किंग, पोलिस ठाणे आणि सेंटर फॉर परफॉर्मिंग, तर नदीकाठी खेळाची मैदाने प्रस्तावित आहेत.











