- जेसीबी व्यवहारात पावणेबारा लाखांची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
महाळुंगे (दि. ३० मे २०२५) :- वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येमुळे चर्चेत आलेल्या हगवणे कुटुंबाची कृत्ये आता उजेडात येऊ लागली आहेत. लता हगवणे व शशांक हगवणेवर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. जेसीबी व्यवहारात तब्बल ११ लाख ७० हजारांची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडे आली आहे. विशेष म्हणजे, पैसे मागितल्यावर पिस्तूल दाखवून धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोपही तक्रारदाराने शशांक हगवणे यांच्यावर केला आहे.
लता राजेंद्र हगवणे व शशांक राजेंद्र हगवणे यांच्या विरोधात तक्रार प्राप्त झाली आहे. प्रशांत लक्ष्मण येळवंडे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ मध्ये प्रशांत येळवंडे यांनी लता व शशांक हगवणे यांच्याकडून २४ लाख रुपयांना जेसीबी खरेदी करण्याचा व्यवहार केला होता. त्यांनी सुरुवातीला ५ लाख रुपये देऊन जेसीबी ताब्यात घेतला होता.
उर्वरित रक्कम बँकेकडील कर्ज हप्त्यांद्वारे फेडण्याचे ठरले होते. प्रशांत यांनी ठरल्याप्रमाणे लता हगवणे यांच्या खात्यात एकूण रु. ६.७० लाख जमा केले. मात्र हगवणे यांनी बँकेचे हप्ते भरले नाहीत. परिणामी, ऑगस्ट २०२४ मध्ये इंडसइंड बँकेने जेसीबी ताब्यात घेतला. यानंतर हगवणे यांनी जेसीबी बँकेतून सोडवूनही प्रशांत यांना परत दिला नाही. रक्कम अथवा जेसीबी परत मिळावी यासाठी प्रशांत यांनी हगवणे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्या वेळी शशांक यांनी कमरेवरील पिस्तूल दाखवून धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.