न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे २०२५) :- महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. महापालिका निवडणुकीआधी त्यांची बदली होईल अशी चर्चा सुरू आहे. त्यामध्येच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) ला त्यांची बदली होणार असल्याची चर्चा गुरूवारी (दि. २९) महापालिका आणि पीएमआरडीए वर्तुळात रंगली होती.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी वसई विरार महापालिकेचे अनिल कुमार पवार यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेला मंत्रालयातील नगर विकास विभागातील काही अधिकाऱ्यांनी दुजोरा दिल्याने आणखी चर्चा रंगली आहे. शेखर सिंह यांची पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदी १८ ऑगस्ट २०२२ ला नियुक्ती झाली होती. त्यांनी तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यामुळे ते बदलीस पात्र आहे.
दुसरीकडे कुदळवाडी कारवाई, पूररेषेतील बंगल्यांवर हातोडा यामुळे ते चर्चेत आहेत. तर शहराचा विकास आराखडा देखील नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये अनेक ठिकाणी हरित क्षेत्राचे निवासी क्षेत्र करणे, आरक्षणे बदलणे आदी बाबींमुळे नागरिकांसह राजकीय पदाधिकाऱ्यांचा आयुक्त सिंह यांच्यावर रोष आहे. नगररचना योजना राबवत असल्याने चऱ्होली गावातील नागरिकांचा रोष आहे. त्यामुळे आयुक्त सिंह यांच्या बदलीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्याला गुरूवारी आणखी हवा मिळाली. येत्या दोन दिवसांत बदलीचा आदेश निघणार असून आयुक्त सिंह यांची बदली होणार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

















