न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०२५) :- कोरोना महामारीत आनंदनगर झोपडपट्टीतील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवत, महामारी नियंत्रणात आणणे, निवृत्त कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्काराची परंपरा सुरू करणे, क्षेत्रीय कार्यालयनिहाय स्पर्धा परीक्षा केंद्रांची सुरुवात करणे आदी विविध प्रमुख कामांसह नगरसचिव, कायदा सल्लागार, सहआयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त अशा चार पदांच्या जबाबदाऱ्या चंद्रकांत इंदलकर यांनी एकाच वेळी पार पाडल्या. ते महापालिकेच्या तब्बल ३७ वर्षांच्या सेवेतून शुक्रवारी (दि. ३०) निवृत्त झाले. यानिमित्त त्यांचा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
इंदलकर हे २० सप्टेंबर १९८८ ला महापालिकेत रूजू झाले. कामगार कल्याण अधिकारी असताना त्यांनी निवृत्तीच्या दिवशी निवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्याची परंपरा सुरू केली. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात भागात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले. सारथी उपक्रमांतर्गत दहा कलमी कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी पार पडली. उपायुक्त झाल्यानंतर त्यांनी कायदा विभागात १५ हजारांहून अधिक अभिप्राय देऊन कायदा विभागातील तब्बल ८५ टक्के पेक्षा अधिक प्रकरणे सोडविली. विधिमंडळ कामकाजाच्या समन्वय म्हणून त्यांनी नोडल अधिकारी म्हणून काम पाहिले. यंदाच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात पर्यावरणीय बजेट समाविष्ट करण्याच्या उपक्रमात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
सत्काराला उत्तर देताना चंद्रकांत इंदलकर यांनी सांगितले, की सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने काम केले. त्यात कोणताही भेदभाव केला नाही. प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरासाठी केलेल्या कामाचा ऋणानुबंधाचा अमूल्य ठेवा कायम आठवणीत राहणार आहे.














