न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०२५) :- कंपनीने बक्षीस स्वरूपात दिलेल्या कार स्वतःच्या नावावर करून घेणे बंधनकारक असताना सात मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह (एमआर) ने कार स्वतःच्या नावावर करून घेतल्या नाहीत. तसेच कंपनीतील नोकरी सोडून कंपनीचा विश्वासघात करत कार वापरल्या. याप्रकरणी सात एमआर विरोधात गुन्हा दाखल आहे. हा प्रकार डिसेंबर २०११ ते मे २०२५ या कालावधीत वाकड येथे घडला.
तरणजित सिंग (चंदीगड), शिवसेन मुरुगसन (चेन्नई), प्रशांत कुमार शेट्टी (कर्नाटक), उपेंद्र सिंग (पणजी), जनमजय कुमार मंजय (दिघी), प्रीतम दास गुप्ता (दावणगिरी), जगन्नाथ दत्ता (कोलकाता) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जिनोवा कंपनीतील व्यवस्थापक महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने बक्षीस स्वरूपात दिलेल्या कार स्वतःच्या नावावर करून घेणे बंधनकारक असताना नावावर केल्या नाहीत.
आरोपी एमआर जिनोवा या औषध कंपनीत काम करत होते. डिसेंबर २०११ मध्ये त्यांना कंपनीने प्रत्येकी एक कार बक्षीस म्हणून दिली होती. त्या कार तीन वर्षात आरोपींनी स्वतःच्या नावावर करून घेणे बंधनकारक होते. मात्र तीन वर्षात आरोपींनी कार स्वतःच्या नावावर करून घेतल्या नाहीत. दरम्यान, आरोपींनी कंपनीतील नोकरी सोडली. त्यानंतर कंपनीने आरोपींना कार नावावर करून घेण्याबाबत नोटीस दिली.
कंपनीच्या प्रतिनिधींनी आरोपींच्या घरी भेट दिली. हजर राहण्याची आणखी नोटीस दिली. मात्र आरोपींनी कंपनीशी कोणताही संपर्क न करता कंपनीचा विश्वासघात केला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास करीत आहेत.