न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ०३ जून २०२५) :- न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य परिवहन विभागाच्या वतीने १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नंबर पाटी (एचएसआरपी) लावण्यात येत आहे. याला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याची ओरड प्रशासन करत आहे; मात्र नंबर प्लेट लावण्याचे केंद्रच अपुरे असल्याने नागरिकांनी नोंदणी केलेली नंबर प्लेट वेळेत बसवून मिळत नाही.
याशिवाय नंबर प्लेट लावण्याची मुदत ३० जून आहे. प्रत्यक्षात वाहन नोंदणी मात्र सप्टेंबर महिन्यापर्यंत होत आहेत. त्यामुळे वाहनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वाहनाच्या सुरक्षेसाठी राज्यात परिवहन विभागाकडून उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एचएसआरपी) बसवण्यात येत आहे. सुरुवातीला या नंबर प्लेटसाठी ३० एप्रिल अखेरची तारीख होती.
परंतु वाहनधारकांकडून कमी प्रतिसाद मिळाल्याने याला ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत नंबर प्लेटची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, अन्यथा वाहनधारकांना १ हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असा इशारा परिवहन शाखेकडून देण्यात आला आहे. मात्र नंबरप्लेट बसविण्यासाठीच्या अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने नंबर प्लेट बसवून घेणाऱ्यांची संख्या तुलनेने खूपच कमी आहे.