न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापनेस २०३२ मध्ये ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने महापालिकेने व्हिजन ५० शहर धोरण हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी शहर कसे असावे याबाबत अधिकाऱ्यांना देखील अभिप्राय देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढले आहेत.
सन २०३२ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिका ५० व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यासाठी व्हिजन ५० अंतर्गत शहराचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. पन्नास वर्षांनंतर शहर कसे असावे, याबाबत सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यामध्ये विविध संस्था, संघटना, प्रशासनाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आले आहे.
राजकीय पदाधिकारी, विद्यार्थी यांचे अभिप्राय घेतले जात आहेत. आता महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील सर्वेक्षणात सहभागी होण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यासाठी क्यूआर कोड दिला असून त्यावरून सर्वेक्षण फॉर्म भरायचा आहे. सर्व विभागप्रमुखांनी या सर्वेक्षणात भाग घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांना देखील सर्वेक्षणात भाग घेण्याची सूचना करायची आहे. तसेच त्याबाबतचे परिपत्रक व क्यूआर कोड विभागामध्ये दर्शनी भागामध्ये लावण्याची सूचना सामान्य प्रशासन विभागाने केली आहे.












