न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. ०३ जून २०२५) :- संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अवघ्या १९ दिवसांनी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून मार्गस्थ होत आहे. पालखी मार्गावर कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत झेंडे मळा ते देहूरोडदरम्यान विविध ठिकाणी धोकादायक लहान-मोठे खड्डे, संरक्षक बाजूपट्टयांची दुरवस्था झाली असून, अनधिकृत गतिरोधकांमुळे या भागातील रस्ता वारकऱ्यांसाठी चालण्यासाठी असुरक्षित बनला आहे. वारकऱ्यांसह पालखीच्या दर्शनाला व पालखी निगडीपर्यंत सोडण्यासाठी जाणाऱ्या भाविकांची वाट अधिकच बिकट होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
चिंचोली ते देहूरोड रस्त्याच्या संरक्षक बाजूपट्ट्यांची दुरवस्था झाल्याने विविध रस्त्यालगत पाणी साचत असून, काही ठिकाणी रस्ता व बाजूपट्टचात अंतर वाढल्याने भजनात तल्लीन असलेल्या वारकऱ्यांना चालताना अडथळा होणार आहे. भाविकांना चालतानाही अपघात होण्याची शक्यता आहे. चिंचोली, अशोकनगर भागासह लष्करी भागात रस्त्याच्या बाजूला गतिरोधकाजवळ लावण्यात आलेल्या दगडांच्या रांगेने पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना चालताना अडथळा होणार आहे.
गेल्या सहा वर्षात झेंडेमळ्याजवळ असलेल्या सीओडी डेपो ते देहूरोड येथील महामार्ग चौक दरम्यानचा रस्त्यावर संत तुकाराम पार्क, लोहमार्गाजवळ, एमई लाईन, शनी मंदिर, गणेश सोसायटी, चिंचोली, अशोकनगर व लष्करी भागात संत तुकाराम महाराज प्रवेशद्वारापर्यंत विविध ठिकाणी धोकादायक लहान-मोठे खोल खड्डे व आडवे चर असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
पालखी मार्गावर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत सीओडी ते देहूरोड महामार्ग दरम्यानच्या रस्त्यावर ३१ गतिरोधक असून, आयआरसी निकषानुसार बनविण्यात आलेले नाहीत. अनेक गतिरोधकांवर पांढरे पट्टे नाहीत. तुकोबारायांच्या पालखी रथाला गतिरोधकांचा अडथळा होणार असून, भजनात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांनाही अडखळून ठेचकळण्याची शक्यता अधिक आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या महिन्यात मागणी केल्यानुसार देहूरोड कॅन्टोन्मेंटने हद्दीतील पालखी मार्गे दुरुस्तीबाबत २१ मे रोजी नाहरकत पत्र दिलेले आहे. संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करून वारकऱ्यांची गैरसोय दूर करावी.”
– अॅड. कैलास पानसरे, सदस्य, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड.