- महापालिकेकडून २२ कोटी ८४ लाखांची निविदा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२५) :- पिंपरी, चिंचवड आणि भोसरी एमआयडीसीसाठी महापालिका स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारणार आहे. हे केंद्र एमआयडीसीने दिलेल्या टाटा मोटर्सच्या माल वाहतूक प्रवेशद्वारासमोरील मोकळ्या भूखंडावर (प्लॉट क्रमांक एफ टू ब्लॉक) या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने २२ कोटी ८४ लाख ७५ हजार रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. हे अग्निशमन केंद्र उभारल्यानंतर एमआयडीसीमधील लागणाऱ्या आगीवर तत्काळ नियंत्रण मिळविण्यात यश येणार आहे.
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी एमआयडीसी परिसरात लघु, सूक्ष्म आणि मध्यम असे सुमारे आठ हजार उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये सुमारे सात लाखाहून अधिक कामगार काम करतात. एमआयडीसीतील एखाद्या कंपनीला आग लागल्यास संत तुकारानगर येथील अग्निशमन केंद्रावर अवंलबून राहावे लागत होते.
बंब येण्यास अधिकचा वेळ लागत असल्याने उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात नुकसात होत होते. या भूखंडावर अग्निशमन केंद्र उभारण्याची पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेची अनेक वर्षांपासून मागणी होती. यासंदर्भात उद्योग मंत्र्यांकडे बैठका झाल्या. त्यानंतर महापालिकेने हालचाली केल्या. अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी मे. एनव्हायरोसेफ कन्सल्टंट यांची नेमणूक केली. त्यानंतर महापालिकेने नुकतीच महापालिकेने २२ कोटी ८४ लाख ७५ हजार ५७६ रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. अग्निशमन केंद्र चार मजल्यांचे असणार आहे.
एमआयडीसीने अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी एफ-टू ब्लॉक येथील भूखंड महापालिकेच्या ताब्यात दिला आहे. या ठिकाणी अत्याधुनिक असे अग्निशमन केंद्र आणि कर्मचा-यांसाठी क्वॉटर उभारण्यात येणार आहे.
– मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका…एमआयडीसीसाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र असावे, अशी आमची सातत्याने मागणी होती. त्या मागणीला आता यश आले आहे. अत्याधुनिक यंत्रणेसह केंद्र उभारावे.
– संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना…












