न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२५) :- पर्यावरणपूरक उपाययोजना करणाऱ्या गृह प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने ‘ग्रीन सोसायटी हा उपक्रम सुरू केला आहे. स्थानिक पातळीवर उपाययोजना राबवून नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश असून, हे पाऊल पर्यावरणस्नेही परिसर आणि जबाबदार नागरी जीवनशैली निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत सोसायट्यांचे मूल्यांकन करण्यासाठी काही प्रमुख निकष ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करणे, सोसायटीमध्ये सेंद्रिय कचऱ्याचे कंपोस्टिंग करणे, सौरऊर्जेचा वापर करणे, पावसाचे पाणी साठवणे (रेन वॉटर हार्व्हेस्टिंग), आणि सांडपाण्याची शुद्धीकरण व पुनर्वापर यंत्रणा बसविणे. प्रत्येक निकष पूर्ण केल्यावर सोसायटीला एक ग्रीन स्टार दिला जाईल. सर्व निकष पूर्ण करणाऱ्या सोसायट्यांचा सन्मान महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते विशेष कार्यक्रमात केला जाईल.
कशी असायला हवी एक ग्रीन सोसायटी?…
कचरा वर्गीकरण: ओला आणि सुका कचरा स्रोताजवळच वेगळा करणे.
घरगुती कंपोस्टिंग: सेंद्रिय कचऱ्याचे सोसायटीमध्येच व्यवस्थापन करणे.
सौरऊर्जा वापर: सार्वजनिक भागांतील वीज गरजांसाठी सौर पॅनेलचा वापर करणे.
पावसाचे पाणी साठवण (रेनवॉटर हार्वेस्टिंग): पावसाचे पाणी संकलित करून वापरणे.
सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापर: सांडपाण्यावर प्रक्रिया करून बागकाम व अन्य उपयोगांसाठी वापरणे.












