- प्रत्यक्ष रस्ता दुरुस्ती आणि गतिरोधक कधी हटविणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. ०५ जून २०२५) :- जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या चौदा दिवसांवर येऊन ठेपला आहे. देहूगावातील झेंडेमळा ते जुना पुणे-मुंबई महामार्ग या ३ किमीच्या पालखी मार्गावर पावलो पावली खड्डे पडले आहेत. साईटपट्टे गायब झाले आहेत, त्यांची जागा खड्ड्यांनी घेतली आहे. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले जात आहे.
अनेक ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत जाऊन ते अनेकांच्या घरात शिरते. तर, काही ठिकाणी अनावश्यक व नियमबाह्य गतिरोधक बसवण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. हा भाग स्थानिक लष्करी प्राधिकरण यांच्या अखत्यारीत येत आहे. त्यामुळे या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात येणार आहे. याबाबत सर्वजनिक बांधकाम (पश्चिम) विभाग यांनी या पालखी मार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड व स्थानिक लष्करी प्राधिकरण यांच्याकडे १६ एप्रिल रोजी ना हरकत दाखला देण्यासाठी पत्र पाठविले होते.
आषाढी पायी वारी व कार्तिकी यात्रा आणि संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याप्रसंगी लाखो वारकरी, भाविक या मार्गावरुन जात येत असतात. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात येणार असून, या संदर्भात सार्वजनिक बांधकामाचे कार्यकारी अभियंता आश्विनी पाटील यांनी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवणे आणि रस्त्यावर पाणी साचू नये यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला चर घेणे, रस्त्याच्या दुतर्फा असलेले साईट पट्टे भरून घेणे तसेच चिंचोली येथील संत तुकाराम महाराज पादुका मंदिर या ठिकणी असलेल्या मैदानाची साफसफाई करणे, अनावश्यक गतिरोधक काढण्यासाठी संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करणे आदी कामे पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार करण्यात येणार आहेत.
चिंचोली गावचे पंडित जाधव, बाळासाहेब जाधव, रामभाऊ सावंत, रमेश जाधव, संभाजी भेगडे, बाळासाहेब जाधव, देवराम भेगडे, संजय सावंत, रमेश कांबळे यांनी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून जिल्हाधिकारी, सर्वजनिक बांधकाम विभाग, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, स्थानिक लष्करी प्राधिकरण तसेच आमदार सुनील शेळके, खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी पालखी मार्गाचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण करावे, संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी डागडुजी करावी, साईट पट्टे तयार करावेत याबाबत वारंवार पाठपुरावा केला होता. पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी या रस्त्याची डागडुजी व इतर कामे करण्यात येणार आहेत.