न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या पुढे गेली आहे. शहरात सर्व धर्मीय लोक राहत असल्याने शहराला मिनी इंडिया म्हणून ओळखले जाते. शहराची गरज ओळखून तसेच, मागणी लक्षात घेऊन मोशी येथे कत्तलखान्याचे आरक्षण प्रस्तावित करण्यात आले आहे.
शहरात कत्तलखाना नसल्याने येथील व्यावसायिकांना खडकी किंवा देहूरोड येथील कत्तलखान्यात जनावरे न्यावी लागतात. शहराची लोकवस्ती वाढून लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यासाठी शहरासाठी स्वतंत्र अत्याधुनिक कत्तलखाना असावा, अशी अनेक वर्षांपासून मागणी प्रलंबित आहे.
त्या मागणीची दखल घेऊन महापालिकेने विकास योजना आराखड्यात मोशी येथे कत्तलखान्याचे प्रयोजन केले आहे. त्यासाठी १५ हजार ६०० चौरस मीटर क्षेत्रफळाची खासगी जागेत कत्तलखान्याचे आरक्षण टाकण्यात आले आहे. ती जागा मोशी सर्व्हे क्रमांक ३२५ पैकी या ठिकाणी आहे. जागा ताब्यात घेण्यासाठी १६ कोटी ६५ लाख रूपये आणि कत्तलखाना विकसित करण्यासाठी १७ लाख रूपये असे एकूण १७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
शहरात अत्याधुनिक कत्तलखाना होणार असल्याने शहराबाहेर जनावरे घेऊन जाण्याची किंवा तात्पुरती व्यवस्था करण्याची वेळ प्रशासनावर येणार नाही. कत्तलखान्याच्या शेजारील १५ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या खासगी जागेवर पशुवैद्यकीय विभागाच्या रूग्णालयाचे आरक्षण प्रस्तावित केले आहे.












