न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ०५ जून २०२५) :- हिंजवडी आयटी पार्क फेज-तीन (राजीव गांधी इन्फोटेक) येथून आठवड्याच्या दर शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून शिवनेरी बस सोडण्यात येणार आहे. यामुळे हिंजवडीतील आयटी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे हिंजवडी ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान प्रवास आरामदायी आणि वातानुकूलित होणार आहे. यापूर्वी कोल्हापूर आणि नाशिकला शिवनेरी धावत आहेत.
शिक्षण, व्यवसाय, नोकरीनिमित्त पुण्यात आलेले अनेक नागरिक हिंजवडी परिसरात राहतात. विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांना शनिवार आणि रविवार सुटी असते. येथील बहुतांश कर्मचारी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर मार्गावर राहणारे आहेत. त्यामुळे शुक्रवारी कार्यालय सुटल्यावर गावी जाण्यासाठी या प्रवाशांना शिवाजीनगर (वाकडेवाडी) येथे यावे लागते. त्यातही बसला गर्दी, त्यामुळे हिंजवडी आयटी पार्क येथूनच छत्रपती संभाजीनगरसाठी बस सुरू व्हावी, अशी मागणी वारंवार होत होती.
त्यानुसार एसटीकडून येत्या शुक्रवारपासून (दि. ६ जून) हिंजवडी आयटी पार्क फेज ३ येथून छत्रपती संभाजीनगरसाठी संध्याकाळी सात वाजता शिवनेरी बस सुटेल. ही बस प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी असेल. तर प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी पहाटे साडेचार वाजता छत्रपती संभाजीनगर येथून हिंजवडी आयटी पार्क फेज तीनसाठी बस सुटेल. त्यासाठी एसटी महामंडळाच्या संकेतस्थळ, मोबाईल अॅपवरून तिकीट बुकिंग करता येणार आहे.
हिंजवडी आयटी पार्क फेज ३ ते छत्रपती संभाजीनगर प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता, आयटी पार्क फेज ३ येथून सुटेल. छत्रपती संभाजीनगर ते हिंजवडी आटी पार्क फेज – तीन दर सोमवारी छ. संभाजीनगर येथून पहाटे साडेचार वाजता सुटेल. प्रवासी भाडे : प्रौढ – ९६८, महिला व ज्येष्ठ नागरिक – ५११ तर ७५ वर्षे – मोफत.