- २५ वर्षीय तरुणीची २१ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. ०५ जून २०२५) :- सॉरी, मला माफ करा, मी हे स्वेच्छेने करत आहे. माझी जगायची इच्छा संपली आहे, अशी चिठ्ठी लिहून हिंजवडीतील एका आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या २५ वर्षीय तरुणीने इमारतीच्या २१ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना ३१ मे रोजी पहाटेच्या सुमारास हिंजवडी येथील एका सोसायटीमध्ये घडली.
अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे (२५, रा. हिंजवडी. मूळ रा. रांजणगाव, पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. अभिलाषाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन वायसीएम रुग्णालयात करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार, तिचा मृत्यू Injury to multiple vital organs म्हणजेच शरीरातील अनेक महत्त्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्यामुळे झाला आहे.
आयटी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होती. दरम्यान, ३१ मे रोजी पहाटे ४ वाजून ३८ मिनिटांनी ती दुचाकीवरून सोसायटीत आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती ४ वाजून ४२ मिनिटांनी लिफ्टमधून २१ व्या मजल्यावर जाताना दिसली. काही क्षणातच तिने तिथून खाली उडी मारून आपले जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच रात्रगस्त अधिकारी आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकीच्या नंबरवरून तरुणीची ओळख पटवली. दुचाकीच्या डिक्कीत मिळालेल्या मोबाईलवरून संपर्क साधल्यावर ती अभिलाषा कोथिंबिरे असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी घरझडती घेतली. त्या वेळी अभिलाषाने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली. सॉरी, मला माफ करा. मी हे स्वेच्छेने करत आहे. माझी जगायची इच्छा संपली आहे, असे तिने त्या चिठ्ठीत लिहिले होते. त्या नोटमध्ये तिने कोणालाही जबाबदार धरलेले नाही. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. सध्या तरी या घटनेत कोणताही संशयास्पद प्रकार अथवा घातपाताचे संकेत मिळाले नसून, नैराश्यामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.